मनपा आयुक्तांनी केल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महापालिका आयुक्तांनी प्रशासनातील कारभाऱ्यांचे खांदेपालट केले असून, पाणीपुरवठा विभागाची संपूर्ण जबाबदारी कार्यकारी अभियंता वसंत भोये यांच्याकडे दिली आहे, तसेच अतिक्रमण हटाव विभाग आणि घरकूल विभागातील रमाई योजनेचा कारभार आता उपायुक्त सविता सोनवणे यांच्याकडे सोपविला आहे. झोन क्रमांक 1 मधील उपअभियंता संजय चामले यांची नगररचना विभागात घरवापसी केली असून, त्यांच्याकडे झोन 6 ते 10 आणि गुंठेवारी कक्षाची जबाबदारी दिली आहे.

आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी 10 जून 2025 मध्ये प्रशासकीय कामकाजाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फेरबदल केले होते. त्यानंतर जानेवारी 2026 पर्यंत महापालिकेतील अनेक अधिकारी निवृत्त झाले. दरम्यान काहींना पदोन्नती मिळाली. शहर अभियंता म्हणून यापूर्वी संजय कोंबडे यांची नेमणूक करण्यात आली. डिसेंबर महिन्यात महापालिका निवडणूक लागल्याने फेरबदल करता आले नाही. निवडणूक संपल्यावर आयुक्तांनी प्रशासकीय कामकाजाची फेररचना केली आहे. 30 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांनी नवीन आदेश जारी केले आहेत.
महापालिकेतील सर्वात महत्वाचा असलेला कामगार विभाग उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांच्याकडे सोपविला आहे. घनकचरा विभाग नंदकिशोर भोंबे यांच्याकडेच असून, त्यांच्या सोबतीला सहायक आयुक्त म्हणून श्रीधर टारपे यांची नियुक्ती केली आहे. सहायक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्याकडे पर्यटन, कामगार, पर्यावरण आदी विभाग दिले आहेत.